राज्यात आठ हजार ९०५ मेगवॉट वीज निर्मिती होणार   

जलसंपदा विभागाकडून तीन कंपन्यांसोबत करार

मुंबई : राज्यात आठ हजार ९०५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. यासाठी ५७  हजार ७६० कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यात आली असून, जलसंपदा विभागाकडून तीन कंपन्यांसोबत एकूण नऊ करार केले आहेत. या करारातून नऊ हजार २०० रोजगारांची निर्मिती होणार आहे. महाजेनको, एमआरईएल, आवादा या तीन कंपन्यासोबत हे करार करण्यात आले आहेत. मंगळवारी जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते.  
 
राज्य सरकार वीज निर्मिती करण्यावर भर देत असून, यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यानुसार, राज्यात आठ हजार ९०५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. यातून ५७  हजार ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. हे बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही गुंतवणूक महत्वाची मानली जात आहे. या वीज निर्मिती कराराचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
शेतकर्‍यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा सरकारने केली होती. ८० टक्के राज्यात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपले राज्यही वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील धरणांवर तरंगते सौर पॅनेल बसवणार 

मुंबई : पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याच्या संदर्भात लवकरच राज्य सरकार मोठा निर्णय घेणार आहे. यासाठी राज्यात तरंगते सौर पॅनेल योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार आहे. याबाबत लवकरच निविदा काढणार आहे. या प्रकल्पांपासून निर्माण झालेली वीज ही शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार आहे. शेतकर्‍यांना यामुळे कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यास मदत मिळणार आहे. 

जायकवाडी धरणावर १२०० मेगावॉटचा फ्लोटिंग प्रकल्प

मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडला होता. यावेळी त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती, वाटचाल, ध्येयधोरणे आणि भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टीने राज्याचा वाटा अशा विविध विषयांवर भाष्य केले होते. 'थोरीयमवर न्यूक्लीअर एनर्जी' असावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हे नवीन तंत्रज्ञान असून, जायकवाडी धरणावर १२०० मेगावॉटच्या तरंगत्या सौर पॅनलद्वारे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.
 

Related Articles